गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती माहिती का लपवली : आमदार निलेश राणे यांचा सवाल

0
43

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी करण्याची केली मागणी

आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे घेतली पत्रकार परिषद

 

कुडाळ | प्रतिनिधी : वैभव नाईक जेव्हा आमदार होते तेव्हा हा गुन्हा घडला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी दबक्या आवाजात चर्चा होती. मग या गुन्ह्याची माहिती नक्कीच माजी आमदार वैभव नाईक यांना होती. मग त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी आवाज का उठवला नाही? असा सवाल शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी उपस्थित करून त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांना नक्कीच या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट पैसे देत होता की काय असा संशय निर्माण होत आहे असे पत्रकार परिषदेमध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी करावी यामध्ये आमचे जरी कोणी पदाधिकारी असतील तरी त्यांच्यावर कारवाई करावी आणि हा गुन्हा लपवला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.

चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांच्या खून प्रकरणानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर आरोप केले. या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, दादा साईल, दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, भाजपा तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जो व्हिडिओ प्रसारित केला आहे. तो व्हिडिओ कधीचा आहे हे पडताळणे गरजेचे आहे. ही घटना २०२३ या वर्षांमध्ये झाली त्यावेळी वैभव नाईक आमदार होते ते संविधानिक पदावर कार्यरत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या काळात या गुन्ह्याची दबक्या आवाजात चर्चा होती जर या गुन्ह्याची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांच्या पर्यंत आली होती तर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देणे गरजेचे होते तसे न करता ९ एप्रिल २५ रोजी प्रकाश बिडवलकर यांच्या मामीने तक्रार दाखल केल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी १४ एप्रिल २५ रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ प्रसारित केला आणि १६ एप्रिल २५ रोजी पोलीस अधीक्षक यांना शिष्टमंडळाद्वारे जाऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
वैभव नाईक आमदार होते. त्यावेळी घडलेली घटना आणि त्यांना याबाबत असलेली माहिती त्यांनी का लपवली त्यावेळी त्यांच्या पक्षामध्ये सिद्धेश शिरसाट कार्यरत होते. त्यांना संरक्षण देण्यासाठी ही घटना वैभव नाईक यांनी लपवली असावी असा संशय निर्माण होत आहे त्यासाठी त्यांनी सिद्धेश शिरसाट कडून पैसाही घेतला असेल यात ही संशय निर्माण होत आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी वैभव नाईक आमदार असताना कबड्डी स्पर्धेचे आयोजन करत असताना या प्रकरणातील माणगाव येथील नार्वेकर हा आरोपीत त्यांच्या समवेत असायचा त्या कबड्डी आयोजनामध्ये त्याचा सहभाग असायचा तसेच या प्रकरणातील अमोल शिरसाट हा आरोपी वैभव नाईक यांच्या समवेत नाचताना फोटो आहे आमदारकीच्या काळामध्ये दारू व्यवसायिकांसह अनैतिक धंद्यांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून पैसे जमा करण्याचा धंदा वैभव नाईक यांचा होता. आता हा धंदा बंद झाल्यामुळे आरोप करीत आहेत. त्यांनी अमली पदार्थ विरोधात एकही पत्रकार परिषद घेतली नाही या अमली पदार्थ विकणाऱ्यांसोबत यांचे लागेबंध आहेत की काय असाही संशय निर्माण होत आहे. असे सांगून भाजप नंतर मी शिंदे शिवसेनेत आलो त्याला अवघे ८ महिने झाले आणि ही घटना २०२३ मध्ये घडली आहे. फक्त एखाद्या घटनेचे भांडवल करून राजकारण करण्याची संस्कृती माजी आमदार वैभव नाईक यांची आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये दोन सामाजिक कामे वैभव नाईक यांनी केली आहेत ती कामे म्हणजे चिपी विमानतळाला टाळे ठोकणार ही घोषणा आणि आता बिडवलकर खून प्रकरणाचे भांडवल करून राजकारण करण्याचे काम वैभव नाईक करीत आहेत. या प्रकरणांमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यांच्याजवळ जर व्हिडिओ होता तर त्यांनी पोलिसां जवळ का दिला नाही त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित कसा केला यामध्ये त्यांना नक्कीच जेल भोगावी लागेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी २००९ ते २०२५ पर्यंतचे सर्व सीडीआरची तपासणी करावी जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांनी केली आहे.

वातावरण बिघडवायला संजय राऊत येत आहेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या खूनांची माहिती आणि पुरावे संजय राऊत यांच्याकडे होते तर साडेसात वर्ष सत्ता असताना या गुन्ह्यांची फाईल का उघडली नाही आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येण्याची भाषा करत आहेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास निधी आणण्यासाठी प्रयत्न केला नाही पण जिल्ह्याचे वातावरण बिघडवून त्याच्यावर राजकारण करण्याचे काम संजय राऊत करीत आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काही प्रकरणे उघडली का गेली नाही असा सवालही आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

बॅनरवर फोटो लावला म्हणजे आरोपी होत नाही

या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, आम्हा लोकप्रतिनिधींना अनेक व्यक्ती भेटत असतात. तसेच बॅनरही लावत असतात त्यांच्यासोबत फोटो असणे आणि बॅनरवर त्यांच्यासोबत फोटो लावणे म्हणजे तो काही आरोपी होत नाही आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासोबत असलेले फोटो प्रसारित करून या प्रकरणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न माजी आमदार वैभव नाईक करत आहेत त्यांच्यासोबतही अनेक फोटो या प्रकरणातील आरोपींचे आहेत असे त्यांनी सांगून वैभव नाईक यांनी आता खालच्या थराचे राजकारण सोडावे आणि विकासात्मक राजकारण करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.