हजारो भाविकांकडून चाळ्याला ‘कोंब्या ‘चा मान
सावंतवाडी । प्रतिनिधी : दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मातोंड- पेंडुर येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या जत्रोत्सवाला सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी अलोट गर्दी केली होती. डोंगरावर स्थित असलेल्या श्री देव घोडेमुखाचे अर्थात शिवमार्तंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध भाविक चढण चढून जात होते. तसे देव घोडेमुखाच्या चाळ्यांना हजारो भाविकांकडून परंपरेप्रमाणे कोंब्याचा मान देण्यात आला.
भक्तांच्या हाकेला धावणार्या शिवमार्तंडेश्वर ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्री घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. सावंतवाडी शिरोडा मार्गावर सावंतवाडीपासून साधारण १५ किलोमीटरवर रस्त्याला लागून असलेल्या निसर्गरम्य डोंगराच्या एका कड्यावर हे देवस्थान वसलेले आहे. जत्रोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच श्री देव घोडेमुखाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. मंदिर डोंगरावर असल्याने वयोवृद्ध भाविकांना डोंगर चढणे अवघड असल्याने डोंगराच्या पायथ्याशी केळी नारळ ठेवण्याची व्यवस्था देवस्थान कडून करण्यात आली होती. तर बऱ्याच संख्येने भाविकांनी तब्बल ७०० ते ८०० मीटर डोंगर चडून श्री देव घोडेमुखाचे दर्शन घेतले.
या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासाहित मुंबई, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, व इतर भागातील भाविक दाखल झाले होते. कोंबड्याची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध असल्याने तसेच श्री देव घोडेमुखाला कोंबड्याचा मान देण्यात येत असल्याने जत्रोत्सवाच्या परिसरात कोंबे विक्री साठी ठेवण्यात आले होते. अनेकांकडून ते विक्री करण्यासाठी मोठी लगबग दिसून येत होती.
दुपारनंतर भाविकांची गर्दी अधिकच वाढत गेल्याने आणि हा जत्रोत्सव मुख्य रस्त्यावर पार पडत असल्याने मुंबई शिरोडा महामार्गावर तब्बल तीन ते चार तास वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. वेंगुर्ला पोलीस ठाण्याकडून वाहतूक कोंडीची समस्या गृहीत धरून आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने काही अंशी वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना यश मिळत होते. मात्र, सातत्याने रस्त्यावरून वाहने इजा करत असल्याने हे वाहतूक कोंडी वारंवार निर्माण होत होती.
सायंकाळी साडेचार वाजता मातोंड सातेरी मंदिर येथून तरंग देवतांचे आगमन झाल्यानंतर खर्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरुवात झाली. यानंतर देवस्वार्या डोंगर चढून घोडेमुख मंदिरात पोहोचल्यानंतर सालाबाद धार्मिक विधिंना सुरुवात झाली. यानंतर गावकार्यांकडून घोडेमुख देवाच्या चाळ्यांना गावकरी मानकरी यांनी कोंब्याचा मान दिल्यानंतर भाविकांच्या आणलेल्या हजार कोंब्याचा मान देण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी भाविकांकडून मोठी झुंबड पाहायला मिळाली. ही प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर सायंकाळी उशिरा देवस्वार्या अवसारी परत सातेरी मंदिराकडे निघाल्यानंतर या जत्रोत्सवाची सांगता झाली. दरवर्षी पेक्षा यावर्षी या जत्रोत्सवाला भाविकांनी अलोट गर्दी केली होती.