आकेरी येथे अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

0

सावंतवाडी कुडाळ मार्गावरील आकेरी घाटाच्या पायथ्याशी दोन दुचाकींच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सागर लक्ष्मण साईल ( ३५, रा. कोलगांव – वाघडोळवाडी ) असे त्याचे नाव आहे. कोलगाव येथून झाराप येथे जाताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरील दुचाकी ला धडक बसून हा अपघात घडला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
दरम्यान, या युवकाचा मृत्यू हा एसटीच्या चाकाखाली आल्यानेच झाला असावा असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनाही एसटीच्या चाकावर काही खुणा आढळून आल्या असून याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र, सदरचा युवक एसटीच्या चाकाखाली आला नसल्याचे एसटी चालकाचे म्हणणे असून पोलिस तपासानंतरच खरे कारण स्पष्ट होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर साईल हा कोलगाव येथील आपल्या घराकडून झारापच्या दिशेने आपल्या ताब्यातील ज्युपिटर दुचाकीने आकेरी मार्गे जात होता. आकेरी घाटीच्या पायथ्याशी समोरून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एसटीला ओव्हरटेक करीत असताना समोरच्या बाजूने सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला त्याची धडक बसली. या अपघातात रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर समोरील ॲक्टिवा दुचाकी स्वार विनोद शिवराम राऊळ हा देखील किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी दोन्ही बाजूने वाहनांची मोठी रांगा लागली होती.दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी चे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे घटनास्थळी दाखल झाले.तसेच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.मृत सागरच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

 

एसटीच्या चाकाखाली आल्यानेच मृत्यू : स्थानिकांचा संशय

सागर साईल या दुचाकी स्वाराचा मृत्यू अपघातानंतर एसटीच्या चाकाखाली आल्यानेच झाला आहे असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर मृत सागरच्या डोक्याला झालेली गंभीर दुखापत पाहता केवळ रस्त्यावर आदळल्याने ती झाली नसून एसटीच्या चाकाखालीच तो आला असावा असा कयास पोलिसांनी देखील व्यक्त केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत असून तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, संबंधित एसटीच्या चालकाने सदरचा युवक एसटीच्या चाकाखाली आला नसल्याचे म्हटले असले तरीही एसटीच्या चाकावर काही खुणा आढळून आल्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने हेल्मेट घातलेले असल्यामुळे चाकाला रक्ताचे डाग लागले नाहीत असेही स्थानिकांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here