नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन ठेकेदाराने रखडवले मंगळवार पासून कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

0
10

कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात कपात करून ठेकेदार मारतोय डल्ला

हजेरी पटावर १२ जादा कर्मचारी दाखवून ठेकेदाराने रक्कम लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड

राजापूर (प्रतिनिधी): येथील नगर परिषदेमध्ये कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या बांधकाम, स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसह डेटा ऑपरेटरना संबधीत व्ही. डी. के. नामक ठेकेदार कंपनीकडून मार्च महिन्याचा पगार देण्यात न आल्याने या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे या विभागांशी निगडीत असलेले न. प. प्रशासनाचे कामकाज ठप्प झाले आहे.

दरम्यान या व्ही. डी. के. नामक ठेकेदार कंपनीची मनमानी कायमस्वरूपी अशाच प्रकारे सुरू असल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असून या ठेकेदाराने प्रत्यक्षात काम करणाऱ्या राजापूर नगर परिषदेतील ३६ कर्मचाऱ्यांचा समावेश असताना हजेरी पत्रकावर आणखी १२ कर्मचाऱ्यांची अधिकची नावे दाखवून त्यांच्या नावे पगार लाटल्याची माहिती पुढे आली आहे. तर प्रत्यक्षात दयेय वेतनापेक्षा कितीतरी कमी पगार देऊन या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही या ठेकेदाराने डल्ला मारल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

मंगळवारी या एकूणच प्रश्नी माजी नगरसेवक संजय ओगले, सौरभ खडपे व रवींद्र बावधनकर यांनी नगर परिषदेवर धडक देत या विरोधात जाब विचारला. यावेळी संबधित ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याला नोटीस देण्यात आली आहे. त्याच्यावर कारवाई केली जाईल व जादा लाटलेली रक्कम वसुल केली जाईल अशी माहिती न. प. चे कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव यांनी दिली.

राजापूर नगर परिषदेकडून बांधकाम, स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसह चालक व डेटा ऑपरेटर यांसारखे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने घेण्यात आलेले आहेत. यासाठी . डी. के. नामक ठेकेदार कंपनीला तीन वर्षापुर्वी ठेका देण्यात आलेला आहे. मुळातच वादग्रस्त असलेल्या या कंपनीला ठेका देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना निश्चित केलेल्या किमान वेतनाप्रमाणे वेतन दिले जात नाही, वेळेत दिले जात नाही अशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. करारात न. प. प्रशासनाकडून जरी निधी वेळेत उपलब्ध झाला नाही तरी आंम्ही कर्मचाऱ्यांचे पगार करू असे लिखित दिलेले असतानाही या कंपनीकडून कर्मचाऱ्यांचे पगार थकवले जात आहेत. एप्रिल महिन्याची १५ तारिख उजाडली तरी या कंपनीकडून संबधीत कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आलेला नाही.

 

अखेर मंगळवारी या विरोधात या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. याबाबत न. प. प्रशासनाला लेखी पत्र देऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केले. दरम्यान या प्रश्नी माजी नगरसेवक संजय ओगले, सौरभ खडपे व रवींद्र बावधनकर यांनी नगर परिषदेवर धडक देत या विरोधात जाब विचारला. त्यावेळी या ठेकेदार कंपनीकडून कशा प्रकारे कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते ही गंभीर बाब पुढे आली आहे.
प्रत्यक्षात कामावर ३६ कर्मचारी असताना ४८ कर्मचारी दाखवून १२ कर्मचाऱ्यांचे पगार या कंपनीकडून लाटले जात असल्याचे उघड झाले. तर या कर्मचाऱ्यांना करारात निश्चित व नमुद केलेल्या किमान वेतनाप्रमाणे वेतन देणे आवश्यक असताना त्यातही तीन ते चार हजारांची कपात करून ती रक्कम देखील ठेकेदार कंपनीकडून लाटली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी या माजी लोकप्रतिनिधींनी केली आहे. तर कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार हा वेळेत आणि निश्चित केलेल्या वेतनश्रेणी प्रमाणेच मिळाला पाहिजे अशीही मागणी करण्यात आली आहे.