कोकणातील पहिली वारकरी शाळा खेड मधील काडवली गावात होणार

0
12
खेड(प्रतिनिधी) लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात वारकरी शिकवण रुजवून वारकरी सांप्रदायाची खरी ओळख देण्यासाठी कोकणातील पहिली वारकरी शाळा तालुक्यातील काडवली येथे २४ गुंठे जागेत उभी राहणार आहे. यासाठी श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व आंबडसचे रहिवासी राकेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. या वारकरी शिक्षण संस्थेत इयत्ता तिसरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक, संगीत अन् अध्यात्मिक शिक्षणाचे धडे दिले जाणार असून सुसंस्कृत पिढी घडवण्याचा संस्थेचा मनोदय आहे.
आजच्या काळात मुलांसाठी केवळ संपत्ती कमवून ठेवणे गरजेचे।नाही तर त्यांच्यावर संस्कार अन् संस्कृतीची गोफ विणणेही तितकेच गरजेचे बनले आहे.
आजघडीला पाचवी, सहावीच्या वर्गात शिकणारी मुलेही व्यसनाधीन होवून आपल्या जीवनाच्या विनाशाकडे वळण घेत असल्याचे विदारक चित्र समोर येते आहे. बालवयातच त्यांच्यावर अध्यात्मिक संस्कार केले तर ही पिढी खऱ्या अथनि सुसंस्कृत होईल अन् जन्मदात्या आई-वडिलांचाही योग्य त्या दर्जात सांभाळही करू शकतील. व्यसनासह कुसंगतीमध्ये भरकटणाऱ्या भावी पिढीला अध्यात्मिक शिक्षण देवून त्यांना सुसंस्कृत अन् सर्वकषदृष्ट्या सक्षम बनवण्याची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवत श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून वारकरी शिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संस्थेने काडवली येथे २४ गुंठे जागाही खरेदी केली आहे. या जागेत लोकसहभागासह संस्थेच्या अथक प्रयत्नातून कोकणातील पहिली वारकरी शाळा उभी राहणार आहे.
या वारकरी शाळेत तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षण, संगीत शिक्षणासह व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देवून सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय शास्त्रोक्त पद्धतीने मृदंग, तबला, गायन, हार्मोनियम, वारकरी भजन, संगणक प्रशिक्षण, सूत्रसंचालनासह संवाद कौशल्याचे धडेही दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारिरीक विकासाची क्षमता उंचावण्याची जबाबदारी संस्था घेणार आहे. परमार्थ अन् सांप्रदायाच्या परिपूर्ण अभ्यासाचे थडे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.
कोकणात पहिली वारकरी शाळा उभारण्यासाठी पुढाकार घेणारे श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे हे कीर्तनकार आहेत. गेल्या १८ वर्षांपासून त्यांची कीर्तनसेवा अव्याहतपणे सुरू आहे. कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वसा हाती घेणाऱ्या राकेश मोरे यांनी आतापर्यंत साडेपाच हजाराहून अधिक कीर्तने केली आहेत. त्यांच्या कीर्तन सेवेसह वारकरी शिक्षण संस्था उभी करण्याच्या संकल्पात सचिव अजिंक्य आंब्रे व अन्य ५ सहकाऱ्यांचाही समावेश आहे. लोकसहभागातूनच वारकरी शाळेची उभारणी केली जाणार असून यासाठी सढळ हस्ते दानशूर हातांच्या मदतीचीही तितकीच गरज आहे.
सांप्रदायाच्या अभ्यासासाठीच शाळा उभारण्याचा निर्णय
कोकणातील मुलांना सांप्रदायाचा परिपूर्ण अभ्यास करता यावा, विकृत विचारांना रोखून परमार्थाचे ज्ञान देण्यासाठीच वारकरी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पाच वर्षांपूर्वीच काडवली येथे गुंठे जमीन खरेदी केली आहे. यामुळे कोकणातील तरुणांना वारकरी शिक्षणासाठी अन्यत्र जावे लागणार नाही, असे मोरे म्हणाले.