डेरवण यूथ गेम्स : कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा ओंकार वडर सुवर्णपदक विजेता

0
14
डेरवण युथ गेम्स मधील कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या ओंकार याला गौरविताना मान्यवर

चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथे एसव्हिजेसिटी क्रीडासंकुलात सुरू असलेल्या डेरवण यूथ गेम्स मध्ये मुंबईत नुकत्याच झालेल्या ५६ व्या सबज्युनिअर आणि ज्युनिअर राज्य कॅरम चॅम्पियन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावून राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेला कोल्हापूरचा ओंकार राजू वडर सुवर्णपदक विजेता ठरला आहे. कॅरम विश्वात लोकप्रिय खेळाडू ठरलेल्या ओंकारने दि. ८ फेब्रुवारीला ठाणे येथे झालेल्या १६ वर्षांखालील खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला होता. आंबोली, सावंतवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळविला होता. गतवर्षी डेरवण यूथ गेम्समध्ये वैयक्तिक व दुहेरीमध्ये त्याने तिसरा क्रमांक मिळविला होता. मात्र या वर्षीच्या डेरवण यूथ गेम्स २०२५ मध्ये दुहेरीमध्ये दुसरा व वैयक्तिकमध्ये प्रथम क्रमांक मिळवून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. कॅरम विश्वात लोकप्रिय ठरलेल्या आपल्या ओंकार या मुलास कोल्हापूरच्या प्रकाश कॅरम क्लबचे मालक मारुती साळुंखे, कोल्हापूर भोसलेवाडीतील माझी शाळा आणि कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय यांच्यासह अनेकांचे सहकार्य, प्रोत्साहन व आशीर्वाद लाभल्याचे असे ओंकार चे वडील राजू वडर हे कृतज्ञतापूर्वक सांगतात.

कोल्हापुरातील कदमवाडीत एका भाड्याच्या घरात वडर कुटूंबीय राहतात. ओंकारचे वडील राजू वडर हे कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करताना मोलमजुरीही करतात. त्यांची पत्नी सारिका रुग्णसेवेचे काम पाहतात. तर थोरला मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. कुटुंबात शेंडेफळ असलेला १३ वर्षीय ओंकार कोल्हापूर भोसलेवाडीतील “माझी शाळा” या प्रशालेत इयत्ता ७वीत शिकत आहे. त्याच्या वडिलांना कॅरमची आवड असल्याने तो नेहमी वडिलांसोबत कॅरम क्लबमध्ये जायचा, तिथे निरीक्षणपूर्वक खेळ पाहायचा. त्यातूनच त्याने कॅरमचे तंत्र आत्मसात केले. कधीकधी क्लबमध्ये एखाद्या कॅरमवर खेळण्यासाठी त्याला संधी मिळायची त्यावेळी त्याच्या खेळातील कसब पाहून क्लबचे मालक मारुती साळुंखे यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्याला पुढील स्पर्धा खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. नुकत्याच कसबा बावडा येथे आयुब जमादार फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत ओंकारने विशेष गटात आपले कौशल्य सिद्ध केले आणि या स्पर्धेनंतरच तो खऱ्या अर्थाने कॅरम मास्टर म्हणून नावारूपाला आला. भविष्यात देशाला एक दर्जेदार कॅरमपटू लाभेल, असा विश्वास कोल्हापूर येथील प्रकाश कॅरम क्लबचे मालक मारुती साळुंखे यांनी व्यक्त केला.

डेरवण यूथ गेम्सच्या कॅरम स्पर्धेत वैयक्तिक गटात मुलांमध्ये कोल्हापूरचा ओंकार वडर प्रथम, रत्नागिरीचा ओम पारकर द्वितीय तर मुंबईचा पुष्कर गोळे तृतीय तर वैयक्तिक गटात मुलींमध्ये रत्नागिरीची स्वरा कदम प्रथम, निधी सप्रे द्वितीय तर कोल्हापूरची ईश्वरी पाटील तृतीय तसेच दुहेरी गटात मुलांमध्ये मुंबईचे प्रसन्न गोळे व पुष्कर गोळे प्रथम, रत्नागिरीचा द्रोण हजारे व कोल्हापूरचा ओंकार वडर द्वितीय तर ठाणेचे प्रसाद माने व निल म्हात्रे तृतीय यांनी यश संपादन केले आहे.