डेरवण युथ गेम्स : डेरवण येथील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत ठाणे, पुणे व सांगलीचे संघ विजयी

0
19
खो - खो स्पर्धेतील मुलांचा आणि मुलींचा विजेता संघ

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या ११व्या डेरवण यूथ गेम्स खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे (मुले), राजमाता आहिल्यादेवी होळकर क्रीडामंडळ सांगली (मुली) यांनी तर १८ वर्षांखालील गटात शिवाजी तरुण मंडळ भडकंबे – सांगली ( मुले ) आणि मुलींच्या गटात ठाण्याच्या रा. फ. नाईक महिला खो-खो संघाने विजेतेपद पटकावले.

गटातील चारही विजेत्या संघाना प्रत्येकी रोख रु. १८०००, उपविजेत्या संघाना रोख रु. १५०००, तृतीय क्रमांकासाठी रोख रु. १०००० तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाना रोख रु. ७००० व भव्य चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेतील १२ वैयक्तिक पारितोषिक विजेत्या खेळाडूंना रोख रु. २००० व चषक देण्यात आले. या स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात उत्कृष्ट संरक्षक म्हणून ओंकार सावंत – विहंग (ठाणे), प्रणिती जगदाळे – रा. फ. नाईक (ठाणे). उत्कृष्ट आक्रमक अथर्व पाटील – भडकंबे (सांगली), स्नेह लांबकाने – काळे प्रशाला (सोलापूर) तर अष्टपैलू खेळाडू म्हणून विवेक पाटील – भडकंबे (सांगली) व वैष्णवी जाधव – रा. फ. नाईक (ठाणे) यांना गौरविण्यात आले. १४ वर्षांखालील गटात उत्कृष्ट सरंक्षक ओम डिंगरे – रमणबाग (पुणे), श्रावणी तामखडे – राजमाता (सांगली), उत्कृष्ट आक्रमक – कार्तिक साळुंखे (संभाजीनगर), अश्विनी गावडे – क्रीडा प्रबोधिनी (जालना), तर अष्टपैलू खेळाडू म्हणून सुशांत कोळी – रमणबाग (पुणे) व वैदिका तामखडे – राजमाता (सांगली) यांना गौरविण्यात आले.
किशोर गटातील अंतिम सामन्यात रमणबाग (पुणे) संघाने राजर्षी शाहू (संभाजीनगर) संघावर पाच गुणांनी विजय मिळविला. रमणबाग संघाकडून ओम डिंगरे याने नाबाद ३.०० मि. व २.०० मि. संरक्षण करून एक गडी बाद केला. सुशांत कोळीने १.४० मि., २.५० मि. व तीन गडी बाद केले. संभाजीनगर संघाकडून आदित्य शिंदेने १.०० मि., २.४० मि. संरक्षण केले. मुलींच्या गटात राजमाता (सांगली) संघाने जालन्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघावर एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला. सांगली संघाकडून वैदिका तामखडेने ५.४० मि. व २.१० मि. तसेच श्रावणी तामखडेने नाबाद ३.१० मि. संरक्षण केले. जालन्याच्या विद्या पवारने १.५० मि. संरक्षण व एक गडी बाद केला.
१८ वर्षांखालील मुलांच्या गटात भडकंबे (सांगली) संघाने विंहग (ठाणे)वर १८-९ असा ९ गुणांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. सांगली संघाकडून अथर्व पाटीलने दोन्ही डावात नाबाद १.४० मि. संरक्षण करीत तीन गडी बाद केले. हर्षद पाटीलने २.५० मि. व दोन गडी तर प्रज्वल बनसोडेने २.३० मि. संरक्षण केले. विंहगकडून ओंकार सावंत व आशिष गौतम यांनी चांगली लढत दिली.
मुलींच्या गटात रा. फ. नाईक (ठाणे) संघाने काळे प्रशाला (सोलापूर)वर ३.३० मि. राखून विजय मिळविला. रा. फ. नाईक संघाकडून वैष्णवी जाधव २.३० मि., नाबाद ३.१० मि. व दोन गडी तर प्रणिती जगदाळे हिने दोन्ही डावात प्रत्येकी ३.५० मि. संरक्षण करून आक्रमणात एक गडी बाद केला व विजयात मोलाचा वाटा उचलला. काळे संघाकडून स्नेहा लांबकाने २.४० मि., २ मि. व एक गडी तर समृद्धी सुरवसे हिने ४.४० मी. संरक्षण करून विजयासाठी पराकाष्टा केली.